Tuesday, July 21, 2009

स्वतःच स्वतःला चार्ज करू या


आपल्यातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आपण नेहमी "वर्तमानात' जगण्याची आणि आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट "आज', नव्हे, "आत्ताच' करण्याची सवय लावून घ्यायला हवी. कामाच्या पद्धतीत सतत नावीन्य आणणे, त्यात बदल करत राहणे यातून आपण स्वतः मनाने ताजेतवाने राहण्यास मदत होते.

""सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते! तेच ते!'' विंदा करंदीकरांच्या एका प्रसिद्ध कवितेची सुरवात. नोकरी असो वा व्यवसाय- रोज उठून ऑफिसला जायचे, रोज तेच तेच काम करायचे, घरीही रुटीननुसार तेच काम करत राहायचे... खरंच कंटाळा येतो ना कधी कधी या सगळ्याचा? "मी का एवढी धावपळ करतोय/ करतेय?', "कशाला मी एवढा त्रास करून घ्यायचा?' असे प्रश्‍नही खूपदा आपणच आपल्या मनाशी विचारत असतो. खरे तर हा प्रश्‍न मनात डोकावू लागला की नक्की समजायचे, की आपली बॅटरी डाऊन झालीय. तिला चार्ज करायची नितांत गरज आहे. आपल्यापैकी काही जण म्हणतील, असा कंटाळा आला की आम्ही कामातून चार दिवस सुटी घेऊन कुठेतरी लांब फिरून येतो. पण नीट पाहिले तर सुटीवर जायच्या आधी रजा घ्यायची म्हणून काम संपविण्याची घाई, जेथे गेलेलो असतो तेथे वेगवेगळी ठिकाणे पाहणे, खरेदी करणे, प्रवासाची धावपळ व पुन्हा परत आल्यावर कामाचे साठलेले डोंगर वाट पाहत असतात. मजा करणे, आराम करणे हे सगळे या घाईगडबडीत राहूनच जाते. अर्थात प्रश्‍न तसाच आहे, की आपण आपली बॅटरी चार्ज कशी करायची? नेहमीच कार्यक्षम व उत्साही कसे राहायचे? त्यासाठी लक्षात घेऊ व चढू या या तीन पायऱ्या.

सर्वात पहिली पायरी म्हणजे कोणतेही काम करताना स्वतःच स्वतःला विचारायचे, की "आपण हे काम का करीत आहोत?'

हे काम खरेच आपल्याला आवडते, की केवळ पैसा व पदाचा विचार करून आपण करत आहोत, हे ठरवायला हवं. आपण करत असलेल्या कामातून आपल्याला आनंद व समाधान मिळत नसेल व केवळ गलेलठ्ठ पगारासाठी आपण काम करीत असू, तर बॅटरी सारखी सारखी डाऊन होणार हे नक्की! अर्थात नेहमी आपल्या आवडीची कामे आपल्याला करायला मिळतात, असे नाही. जी कामे आवडत नाहीत तीसुद्धा आपल्याला नाइलाजाने का होईना, पूर्ण करावी लागतात. तेव्हा कोणतेही काम असो, ते मी आनंदाने व पूर्ण क्षमतेने पार पाडणार, असा विश्‍वास आपण स्वतःला द्यायला शिकले पाहिजे. आजकाल सर्वत्र इन्स्टंटचा जमाना असल्यामुळे सगळे काही आपल्याला झटपट हवे असते. पण कामातील आनंद घ्यायचा असेल, आपली ऊर्जा टिकवायची असेल तर सोपा व तात्पुरता मार्ग उपयुक्त ठरत नाही. समजा आपल्या अंगणात खूप गवत वाढलेले आहे. ते गवत काढण्याचे दोन मार्ग आहेत- एक सोपा व दुसरा कठीण.

सोपा मार्ग म्हणजे गवत काढण्याचे यंत्र फिरवायचे. यामुळे काही दिवस अंगण अगदी स्वच्छ दिसते, पण लवकरच जोमाने गवत पुन्हा उगवते. दुसरा थोडा कठीण मार्ग म्हणजे खुरपे घेऊन, गुडघ्यावर बसून मुळापासून गवत उपटून काढायचे. हे करायला वेळ लागतो, थोडे कष्ट पडतात; पण गवत पुन्हा लवकर उगवत नाही. हा दुसरा मार्ग थोडा कष्टप्रद व अवघड असला तरी काम मुळापासून पूर्ण झाल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो व हा आनंद बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतो.

स्वतःला चार्ज करण्यासाठीची दुसरी पायरी म्हणजे आपला सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे, टिकविणे व वाढविणे. आपल्याला आयुष्यात जे मिळालेय त्याचा विचार आपण करायला हवा. त्यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळ काढायला हवा. बऱ्याच वेळा जे आपल्याकडे नाही त्या बाबतीत तक्रार करण्याच्या नादात जे आपल्याजवळ आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्यातील सकारात्मकता वाढविण्यासाठी आपण नेहमी "वर्तमानात' जगण्याची व आपण करीत असलेली प्रत्येक गोष्ट "आज', नव्हे, "आत्ताच' करण्याची सवय लावून घ्यायला हवी. कारण काम करून होणाऱ्या श्रमांमुळे जेवढा थकवा येतो त्यापेक्षा जास्त थकवा काम टाळण्याच्या सवयीमुळे येतो. बऱ्याच वेळा एखादे काम पूर्ण झाले नाही किंवा अपयश आले की एखादी गळकी टाकी जशी हळूहळू रिकामी होते, तशीच आपली काम करण्याची ऊर्जा कमी होत जाते. अपयश म्हणजे काय, तर आपण करीत असलेल्या कामाचा अपेक्षित परिणाम न मिळणे. अपयश टाळण्यासाठी व यश मिळविण्यासाठी आपण जे मनात आणतो, त्यावर विश्‍वास ठेवला तर ते काम पूर्णपणे पार पाडू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. कारण कोणत्याही कामाचे यश हे आपल्या विचारात, कृतीत व वृत्तीत असते. आपल्याला चार्ज करण्यासाठीची तिसरी पायरी म्हणजे आपल्याला काम करण्याच्या पद्धतीत सतत नावीन्य आणणे.

काम करीत असताना त्यात काही चांगले बदल करत राहण्याची वृत्ती निर्माण करायला हवी, त्याबरोबरच आपल्या स्वतःच्या मनाला रोज निवांतपणे भेटले पाहिजे। तोचतोचपणा आपल्या कामाला आणि आयुष्याला साचलेपणा आणतो, त्यामुळे रोजच्या कामात नावीन्य आणण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा. उदा.- ऑफिससाठी लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करून बघा; नेहमीच्या रस्त्याऐवजी एखाद्या दिवशी दुसऱ्या रस्त्याने ऑफिसला जा, इत्यादी. थोडे वेगळे जगून बघितल्याने आपल्या कामाला प्रवाहीपणा येतो. कामाचा सुंदर प्रवाह आपल्यातील उत्साह वाढवितो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही काम करताना कुठे आणि केव्हा थांबायचे, हे आपल्याला अचूक माहिती असेल तर आपण नेहमीच चार्ज्ड राहतो. चला तर मग! काम करण्याची ऊर्जा वाढविणे आणि टिकविणे यासाठी आपला योग्य व समतोल आहार, व्यायाम व विश्रांती यांची तजवीज करू या व ही ऊर्जा वापरायची पुरेपूर स्पष्टतासुद्धा आपल्यामध्ये वाढवू या.

सौज्यन्य :ई-सकाळ

No comments:

Post a Comment