Tuesday, July 21, 2009

आयुष्यावर बोलू काही


वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, विरंगुळा आणि काम यात समतोल हवा. मनाचा आनंद हेच तर आयुष्याचं सार आहे. त्यानंच आयुष्याला अर्थ येतो. मानव जातीच्या जगण्याचा खरा उद्देश आनंद मिळवणं हाच आहे, म्हणूनच आयुष्याची गती जरा कमी करून थोडं शांत बसा. आपल्याला मनापासून काय आवडतं त्याचा शोध घ्या आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीच करा.

आपणा सर्वांना एका हावरट आणि श्रीमंत शेतकऱ्याची गोष्ट माहिती आहे ती अशी - या शेतकऱ्याला राजाकडून असं एक वचन मिळालं, की तो एका दिवसात जेवढं अंतर चालेल तेवढी जमीन त्याला बक्षीस दिली जाईल. त्यासाठी अट अशी होती, की चालायला तो जिथून सुरवात करेल त्या ठिकाणी त्यानं सूर्यास्तापर्यंत पोचायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी या श्रीमंत शेतकऱ्यानं वेगानं चालायला सुरवात केली; कारण त्याला जास्तीत जास्त जमीन मिळवायची होती. दुपारी तो बराच दमला होता, तरी चालतच राहिला; कारण भरपूर श्रीमंत व्हायची आयुष्यातली ही अपूर्व संधी त्याला गमवायची नव्हती.

दुपार सरल्यावर राजानं घातलेली अट एकदम त्याच्या लक्षात आली. जिथून सुरवात केली तिथं त्याला सूर्यास्तापूर्वी परत पोचायचं होतं. जास्तीत जास्त जमीन मिळवायच्या लोभामुळे तो आता खूप दूर आला होता. त्यानं परतीचा प्रवास सुरू केला. त्याचं लक्ष सूर्यास्ताकडे होतं.

सूर्यास्त जवळ येऊ लागला तसा तो अधिक वेगानं परतू लागला. आपण अकारण फार दूर चाललो हे त्याच्या लक्षात आलं, वेग अधिक वाढवणं प्राप्तच होतं. तो पूर्णपणे थकला होता. त्याला श्‍वासही घेणं खूप अवघड जात होतं, तरीही सर्व शक्ती पणाला लावून तो पळतच होता आणि अतिशय कष्टानं तो कसाबसा सकाळी निघालेल्या जागी येऊनही पोचला; परंतु अति श्रमामुळे तो धाडकन जमिनीवर कोसळला. तो काही परत उठू शकला नाही. तो सूर्यास्तापूर्वी मूळ जागेवर तर पोचला त्यामुळे राजानं सर्व जमीन त्याला दिलीही; पण त्याला मृत्यूला कवटाळावं लागलं. शेवटी त्याला तेथेच पुरण्यात आलं. त्यासाठी त्याला फक्त साडेतीन हातांची जागा पुरली.

या गोष्टीत एक मोठं सत्य दडलेलं आहे. तो शेतकरी श्रीमंत होता की नाही हे महत्त्वाचं नाही. अति हव्यासानं, लोभामुळे भारलेल्या कोणत्याही माणसाचा शेवट हा याच पद्धतीनं होतो हे मात्र विदारक सत्य आहे.

ही गोष्ट म्हणजेच आपल्या आजच्या जीवनाचं प्रवासवर्णनच नाही का? मती गुंग करणारी गती आपल्या आयुष्याला आली आहे. प्रत्येक जण वेगानं, अधिक वेगानं नुसता धावतो आहे.

आपण दिवसामागून दिवस पैसा, अधिकार आणि मान्यता मिळविण्यासाठी जिवाच्या आकांतानं धावतच राहतो ना? असं करीत असताना आपण आपले आरोग्य, स्वास्थ, कुटुंब, आपले छंद, आतला आवाज आणि आपल्या सभोवतालच्या अनेक सुंदर-सुंदर गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असतो. प्रथम संपत्ती, अधिकार आणि आणि मान्यता मिळविण्यासाठी आपण आपलं आरोग्य खर्चून बसतो आणि नंतर आरोग्य परत मिळविण्यासाठी आपल्याला मिळवलेली सर्व संपत्ती खर्चावी लागते. मग एक दिवस आपल्या लक्षात येतं की हे सर्व मी का केलं?

खरंच पैशाची आपल्याला किती गरज असते? पण, हे लक्षात येतं तेव्हा मात्र आपण काळ मागं नेऊ शकत नाही आणि गमावलेल्या गोष्टीही आपण परत मिळवू शकत नाही. समोर असलेली शिडी तर आपण दमछाक करून बरीच वरती चढून आलेलो असतो; परंतु वर आल्यावर आपल्या लक्षात येतं, की ही शिडीच आपण चुकीच्या भिंतीवर लावलेली असते. आयुष्य म्हणजे नुसता पैसा, नुसती सत्ता, नुसता अधिकार मिळवणं नाही! आयुष्य म्हणजे नुसते काबाडकष्ट करणंही नाही. आयुष्य जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे हे खरं; पण किती? पैसा साधन आहे; परंतु साध्य मात्र नक्कीच नाही.

वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, विरंगुळा आणि काम यात समतोल हवा. आपल्या आयुष्यात हा समतोल कसा आणायचा हे आपल्यालाच ठरवावं लागतं. आपला प्राधान्यक्रम ठरवा. आयुष्य ही एक तडजोड आहे हे लक्षात ठेवा; पण असे निर्णय घेताना आपलं अंतर्मन काय सांगतं याकडे लक्ष द्या. त्याच्याकडे काणाडोळा तर नक्कीच व्हायला नको. मनाचा आनंद हेच तर आयुष्याचं सार आहे. त्यानंच आयुष्याला अर्थ येतो. मानव जातीच्या जगण्याचा खरा उद्देश आनंद मिळवणं हाच आहे, म्हणूनच आयुष्याची गती जरा कमी करून थोडं शांत बसा. आपल्याला मनापासून काय आवडतं त्याचा शोध घ्या आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीच करा. काम करताना निसर्गाचा आनंदही मनमुराद लुटा. अवतीभोवतीच्या मंडळीच्या भाव, भावनाही जोपासा. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. ते छोटं आहे, थोरही आहे. आयुष्य गृहीत धरता येत नाही. आयुष्यातील समतोल साधा आणि उशीर होण्यापूर्वीच आयुष्य पूर्ण अर्थानं जगा!

सौजन्य: ई-सकाळ




No comments:

Post a Comment