Thursday, July 23, 2009

माझं किचन : प्रिया बेर्डे


आत्म्याशिवाय शरीराची कल्पना करता येत नाही, तसे स्वयंपाकघराशिवाय पूर्णार्थाने घर असूच शकत नाही. म्हणून स्वयंपाकघर म्हणजे घराचा आत्मा, ही माझी पूर्वीपासूनच धारणा आहे. माझ्या स्वयंपाकघरात केवळ घरातील मंडळींपुरता स्वयंपाक कधीच होत नाही. स्वयंपाकाची आणि रसना तृप्त करण्याची हौस ही मला बालपणापासूनच; पण मला स्वयंपाकघरात ताबा मिळाला तो तारुण्यात. जबाबदारी अंगावर पडल्यामुळे.

आज मी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवीत असले तरी मला पक्कं आठवतं, की माझी पहिली रेसिपी म्हणजे कांदेपोहे. ते मी नक्की कधी केले तेवढे आठवत नाही. आम्ही मूळचे कोल्हापूरचे. सण-सोहळे मोठ्या धुमधडाक्‍याने साजरं करणारं माझं माहेर. त्यामुळे नवरात्र, गणेशोत्सव असे सण घरी साजरे होत व तेवढ्याच जेवणावळीही उठत. अशा शुभप्रसंगी पुरणपोळ्या, तसेच उकडीच्या मोदकांपासून ते खिरीपर्यंत सारं गोडधोड घरीच केलेलं असायचं. नारळीभात, साखरभात, काजू-कतली यांच्यासोबत पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा हेही कोल्हापूरचं वैशिष्ट्य आमच्या स्वयंपाकघरात असायचं.

मी लक्ष्मीकांतशी लग्न केलं. माझं सासर म्हणजे संयुक्त कुटुंब. २०-२५ माणसं गणेशोत्सव काळात आमच्या घरी असतात. या घरात मला स्वयंपाक करण्याचा मनमुराद आनंद लुटता आला. माझ्या जाऊबाई- म्हणजे रवींद्र बेर्डे यांच्या पत्नी सुगरण. लक्ष्मीकांतची पहिली पत्नी रुही हिच्या हातालाही कमालीची चव होती. या घरात मी मांसाहार करायला शिकले. माझ्या नणंदेकडून मी भंडारी पद्धतीचं जेवण शिकले. मग तो साधा जवळा असो किंवा मसाल्याची सुरमई असो, कोंबडी असो वा मटण असो, बिर्याणी असो वा गोव्याची मच्छीकरी असो... मला सारे पदार्थ चांगल्या प्रकारे करता येतात, असा इतरांचा अभिप्राय आहे. मला केवळ मांसाहारच आवडतो असं नाही; शाकाहारही मला तितकाच प्रिय. अगदी पिठलं-भातही मला आवडतो. शेपू, कारली, दुधी भोपळा, कडधान्यं, बटाट्याची भाजी, पालेभाजी- सारं मला प्रिय.

लक्ष्मीकांत तसा खवय्या होता. चमचमीत आणि मसालेदार मांसाहार त्याला भारी प्रिय असे. असा कुणी खाणारा असला की साहजिकच तसे पदार्थ करायलाही मजा येते. लक्ष्मीकांतला माझ्या हातची बटाट्याची भाजीही खूप आवडायची. चित्रपट क्षेत्रातील कितीतरी माणसं लक्ष्मीकांतसह माझ्या घरी खास जेवायला यायची. अशोक सराफ, सचिन, विनय, जॉनी लिव्हर, डी. रामा नायडू, सतीश शहा, विजय कदम असे कितीतरी जण अजूनही जेवणावळींची आठवण काढतात.

"सम्राटासारखं भोजन असावं, कोणत्याही प्रकारच्या कटकटीशिवाय प्रसन्नतेने आणि अन्न हे पूर्णब्रह्म मानून मनसोक्त त्याचा आस्वाद घ्यावा,' ही माझी जेवणाविषयीची कल्पना. जेवण तयार करून ते वाढावं, हा स्वयंपाकाचा मूळ हेतू नाही. केलेल्या स्वयंपाकातील पदार्थांना ताटात जागच्या जागी स्थान देऊन, सजवून, चित्ताला प्रसन्नता येईल अशा प्रकारे ते वाढले जावेत आणि हे सारं करताना स्वच्छता पाळावी, हे मी माझ्या वडिलांकडून शिकले. पाटा-वरंवटा, परात ही पूर्वीची साधनंही घरात आहेत आणि वापरातही आहेत.

जेवणाचं हे महत्त्व मी माझ्या चित्रीकरणाच्या घाईगर्दीच्या वेळापत्रकातही जपते. कोणताही चित्रपट स्वीकारताना माझी पहिली अट असते ती साऱ्यांना चांगलं जेवण मिळालं पाहिजे. या साऱ्यांत कलाकार असतात तसे स्पॉटबॉयही असतात. त्यात अजादुजा भाव नाही. जेवण पंचतारांकित हवं, असा त्याचा अर्थ नसतो, तर जे असेल ते चांगलं असावं, एवढंच. आमच्या प्रॉडक्‍शनच्या वेळी मी स्वतः घरून जवळपास ४०-५० जणांचं जेवण घेऊन जात असे. अजूनही चित्रीकरणाला जाताना मी घरचाच डबा घेऊन जाते. घराबाहेरचं जेवण सहसा पोटात जात नाहीच. आताही जेव्हा माझी मुलं घरी येतात, तेव्हा मी दोन-तीन दिवस घरातच मुलांसोबत असते. त्या वेळी कोणत्याही कामापेक्षा मुलांचं सान्निध्य माझ्या लेखी महत्त्वाचं असतं. या दोन-तीन दिवसांत मी मुलांना जे जे काही खायचं असेल ते ते करून देते. त्या वेळी वरण-भातापासून ते चायनीजपर्यंत सारं काही माझ्या स्वयंपाकघरात शिजत असतं.

माझी आवडती बटाट्याची भाजी

नोकरीवर जाणाऱ्या गृहिणींना घाईघाईत आणि गडबडीत स्वयंपाक करून घड्याळाच्या काट्याबरहुकूम रेल्वे पकडणं शक्‍य नसतं. अशा वेळी पटकन होणारी, स्वादिष्ट व पौष्टिकही असणारी भाजी मी आज मैत्रिणींना सांगणार आहे. ही डिश मला खूप आवडते.

साहित्य ः उकडलेले चार-पाच बटाटे, चार कांदे, १५ ते २० लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, तीन-चार टोमॅटो, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, हळद, तिखट.

कृती ः हिंग, जिरे, मोहरी यांची तेलात फोडणी घालावी. यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्त तेल वापरावं. लसूण आणि आल्याची पेस्ट करू नये, तर ते वाटून घ्यावेत. (म्हणजे हे पदार्थ दाताखाली यायला हवेत.) हे मिश्रण मिसळून त्यात त्यानंतर हळद टाकून त्यात कांदा परतून घ्यावा. हळद टाकल्यावर कांदा व्यवस्थित भाजला जातो. त्यानंतर चिरलेले टोमॅटो व तिखट टाकावं. भांड्यातील हे पदार्थ व्यवस्थित फिरवून घेतल्यावर त्यात बटाटे टाकावेत व पुन्हा परतून घ्यावेत. त्यानंतर झाकण टाकून पाचेक मिनिटं वाफेवर शिजवावेत. ही डिश एकदा तरी करून पाहाच.

प्रिया बेर्डे

सौज्यन्य : ई-सकाळ





No comments:

Post a Comment