Wednesday, July 1, 2009

फीचर्स:"बिफोर टाइम''

"बिफोर टाइम"
हा अनुभव आहे १७ एप्रिलचा. काही कामानिमित्त मी आणि माझे सहकारी पुण्याहून अमरावतीला निघणार होतो. बसचे तिकीट दोन दिवस आधीच काढले होते. जंगली महाराज रोडवरून सहा वाजता बस निघणार होती. दिलेल्या रिपोर्टिंग टाइमप्रमाणे ५.४५ ला आम्ही स्टॅंडवर पोचलो. चौकशी केल्यावर तिकडच्या माणसांनी आम्हाला झापण्याच्या स्वरात विचारलं; "किती वाजले? वेळेवर यायला नको आणि मग बस चुकली की कटकट करतात. बस आत्ताच गेली ! आता बस धरायची असेल तर ताबडतोब येरवड्याचा स्टॉप गाठा.''आमच्या पायाखालची जमीनच सरकली. काहीही चूक नसताना त्याची बोलणी खाऊन आम्ही निघालो. "वेळेआधी बस सोडलीच कशी? आणि तिकीट काढून प्रवासी आले नसतील तर फोन करून विचारायला काय झालं?' असे असंख्य प्रश्‍न मनात उभे राहिले; पण बस गाठणे जास्त महत्त्वाचे होते म्हणून आम्ही ताबडतोब रिक्षा करून येरवड्याकडे प्रयाण केले. प्रचंड गर्दी होती. घड्याळाचे काटे सरकत होते तशी आमची परत बस चुकायची भीती वाढत होती. तेवढ्यात मी बस कंपनीच्या ऑफिसमध्ये फोन करून बस आमच्यासाठी थांबवण्याची विनंती केली. "बस जास्तीत जास्त दहा मिनिटं थांबेल; लवकर पोचा', असं म्हणून त्यांनी फोन आपटला.गर्दी, ट्रॅफिक जॅम, सिग्नल पार करत करत एकदाचे आम्ही बसपाशी पोचलो. सामान डिकीत ठेवता ठेवता त्याला अशी कशी बस वेळेआधी सोडली? म्हणून विचारणा केली असता, "ऑफिसमध्ये चौकशी करा, आम्हाला सांगितलं, की आम्ही निघतो,' अशी तोडकी-मोडकी उत्तरं मिळाली. बसमध्ये शिरल्यावर असे लक्षात आले, की अर्धी बस रिकामीच होती. आमच्यासारखे अजून बरेच जण तिकडे पोचायचे होते. सर्व प्रवासी येईपर्यंत बराच वेळ गेला आणि साडेआठला आमची बस एकदाची निघाली. नंतर असे कळले, की प्रचारासाठी कोणीतरी नेते त्या दिवशी पुण्यात येणार होते म्हणून रस्ते बंद केले होते. कितीही योग्य कारण असलं तरी प्रवाशांना फोन करून बस लवकर निघाल्याची माहिती देणं हे बस कंपनीचं काम नाही का? का पैसे घेतल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या? मनात विचार आला, हे नेते निवडून येण्याआधीच असा लोकांना त्रास देत असतील तर निवडून आल्यावर काय करतील??

सौजन्य: ई -सकाळ

No comments:

Post a Comment