Wednesday, July 1, 2009

फीचर्स:फुललेल्या कुशीचं गाणं

माझ्या लग्नाला या वर्षी २१ वर्षं पूर्ण झाली. या एकवीस वर्षांचे खूप सुख-दुःखाचे अनुभव आहेत. ते सर्व लिहिता येणार नाहीत. पण सर्वांत मोठा अनुभव आहे तो वांझोटेपणात काढलेला.
एखादी स्त्री वांझ असणे हा तिचाच दोष असतो, असा लोकांनी समजच करून घेतलेला आहे. तो दोष मस्तकी घेऊन पंधरा वर्षे काढली. दवा, पाणी, डॉक्‍टर, बाबा, मंत्र, तंत्र, गंडे, दोरे हे सर्व करत असतानाच पंधरा वर्षांनी गोड बातमी कळली, की मी आई होणार आहे! आणि माझ्या आनंदाला उधाण आलं. पण ही बातमी दोन महिने वयाचीच होती.
सोनोग्राफीत त्या बाळाची नैसर्गिक वाढ खुंटली आहे, असं सांगितलं आणि डॉक्‍टरांनी या सांगितलेल्या शब्दांमुळे माझ्या पायाखालची जमीनच हादरली. माझ्या या आनंदात सहभागी होणारे सर्वच हादरले. मला कसे सांभाळून घ्यावे, हे त्यांना कळेच ना. पण जे होणार होते ते ते थांबवू शकत नव्हते. शेवटी एकदाचा गर्भपात करावा लागला. त्यानंतर मात्र मुलाचा विषय सोडून दिला. (पण मनात होतंच.) त्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी तोच दिवस उजाडला. त्या दिवशी कळलं, की मी पुन्हा आई होणार आहे.
पुन्हा तपासण्या, औषधी गोळ्या, सोनोग्राफी यांचे सत्र सुरू झाले. आधी घडलेल्या त्या घटनेमुळे मी जरा दडपणाखालीच वावरत होते. पण ते काही वावगं ठरलं नाही. चार महिनेनंतरच्या सोनोग्राफीत कळलं, की बाळाच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या हृदयाला रक्तपुरवठा करण्यात कमजोर ठरत होत्या. म्हणजेच हृदयाचा वॉल खराब आहे आणि एक मोठे छिद्र आहे असे कळले. आता काय निर्णय घ्यावा हा प्रश्‍न होताच. आई होण्याची जिद्द मनात होती. शेवटी घरच्यांचे, बाहेरच्यांचे, डॉक्‍टरांचे चांगले वाईट सल्ले ऐकून आई व्हायचे ठरवले. पण ते फार जोखमीचे, जिद्दीचे काम आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासाठी रोज बाळाचे ठोके मोजणे, बाळ पोटात किती वेळा फिरतं ते बघणे, औषध, पाणी हे डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली सुरू झाले. मनातले दडपण वाढतच होते. त्यात सीझर ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्‍टरांनी सांगितले.
बाळ नॉर्मल स्थितीत नसल्याने डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही असे डॉक्‍टरांनी आधीच सांगितले होते. आणि एकदाचा तो दिवस उजाडला, एक जून, २००५.
एक छोटी परी माझ्या आयुष्यात आली. "तनिष्का.' ती झाली त्याचा आनंद एकही दिवस उपभोगू दिला नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्‍टरांनी तिच्या हृदयाचं ऑपरेशन त्वरित करावं लागेल असं सांगितलं आणि मनावर पुन्हा आघात झाला. बाळ होण्याच्या शुभेच्छा घेत तो वेळ आनंदात काढावा असं तेव्हा वाटतसुद्धा नव्हतं. मनात प्रश्‍नांचं काहूर माजलं होतं.
तनिष्काला घेऊन मी आणि तिचे वडील पुण्यातील नामांकित डॉक्‍टरांकडे गेलो. पण तनिष्काचं ऑपरेशन यशस्वीपणे पार पडेल याची गॅरंटी कोणीच देत नव्हते. नाही तर तनिष्काची आशा सोडावी लागेल, असे डॉक्‍टरांनी सांगितले. बाळाबरोबर माझीही तब्येत बिघडत होती. तरी आपण धीर सोडायचा नाही असा मी निर्धार मनाशी केला होता. प्रत्येक जण मला आपण यावर काय करू शकतो हे समजावत होतं. पुण्यातील डॉक्‍टरांकडून निराश होऊन मी मुंबई गाठली.
मुंबईतील दोन-तीन नामांकित डॉक्‍टरांकडूनही निराशा पत्करावी लागली. मुंबईतील नामांकित हार्ट इन्स्टिट्यूटनेही मला नाराज केलं. मुंबईत मी तनिष्काला डॉक्‍टरांबरोबर देवालाही घेऊन गेले. हे सर्व पेलण्याचे मला बळ मिळू दे, हे मागणं मागत होते. ते मागणं देवाने पूर्णही केलं. मी मुंबईतील माटुंगा येथील डॉक्‍टर भरत दळवी यांच्याकडे तनिष्काला घेऊन गेले. त्यांनी मला तनिष्काची ९९ टक्के गॅरंटी दिली. मनात एक आशेचा किरण दिसू लागला. हा सर्व डॉक्‍टरांचा खेळ करण्यात तनिष्का दहा महिन्यांची झाली. या दहा महिन्यांत तनिष्काची तब्येत खालावत चालली होती.
प्रत्येक वेळी रडताना ती काळी-निळी होऊन बेशुद्ध पडायची. या दहा महिन्यांत तिने दूध कमी आणि औषधंच जास्त घेतली होती किंवा असं म्हणा ना ती औषधावरच जगली. जन्म झाल्या झाल्या ज्या मुलीचे ऑपरेशन सांगितले त्या मुलीने दहा महिने काढणं हा माझ्यासाठी चमत्कारच होता. माझ्यासाठी ती आज दिसते आहे, उद्या दिसेल की नाही याची शाश्‍वती नव्हती. तिला मी जेथे जेथे घेऊन फिरले तेथे तेथे प्रत्येक पावलाबरोबर माझ्या पाठीशी उभी राहिली ती माझी मोठी वहिनी सुनीता. कारण माझीही तब्येत त्याच काळात बिघडत चालली होती. ती मला आणि बाळाला दोघांनाही सांभाळत होती.
डॉ. दळवी ऑपरेशन नानावटी हॉस्पिटलमध्ये करतात, असे समजले. आणि तनिष्काचं ऑपरेशन दहा मे, २००६ रोजी नानावटीमध्ये यशस्वीरीत्या पार पाडले. आणि माझ्या हिरमुसलेल्या कळीला बहर आला. गर्भवती राहिल्यापासूनचे ते तनिष्काचे ऑपरेशन हे दिवस अग्निपरीक्षेचे होते. पण याच काळात माझ्या पाठीशी उभा राहिलेला माझा परिवार. माझी मोठी ताई पुष्पा, माझी लहान बहीण अविता, माझे दोन्ही भाऊ-वहिनी, माझी आई आणि लहान भाच्या विनिता, आरती, पूजा, पूनम, प्रियांका, दर्शनी आणि माझा भाचा आकाश यांनी मला जो मानसिक आधार दिला तो शब्दांत लिहिता येणार नाही. आज तनिष्का चार वर्षांची आहे। हा काळ मला बरेच शिकवून गेला. आपल्या कमजोर काळात आपण धीर खचू द्यायचा नाही. आपल्या माणसांत फक्त माझ्या माहेरचे नसून माझे सर्व नातलग आणि मित्र परिवार यांचा फार मोठा वाटा आहे. आणि त्याची मला जाणीव आहे
सौज्यन्य : ई-सकाळ



No comments:

Post a Comment