Wednesday, July 1, 2009

मुक्तासंवाद 2 : एक नात

बारा वर्षांनी का होईना, पण रक्ताची नाती एकत्र येतात, असं म्हटलं जातं. पैसा नातं जुळवितोही आणि तोडतोही. कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी पैसाच दडलेला असतो.

काही आर्थिक कारणावरून आम्हा दोघा भावांमध्ये वितुष्ट आलं. रक्ताचं नातं विसरलं गेलं. दोन दिशांना दोघांची तोंडं झाली. आम्ही दोघांनी वेगवेगळा संसार केव्हाच थाटला होता. गंजपेठेतील वडिलोपार्जित भाड्याचं घर त्याच्या ताब्यात देऊन मी कोथरूडला घर बांधलं होतं.

एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं, ते पैशापायी दुरावलं गेलं. जेथे माझं बालपण गेलं, ज्या घरात सुरवातीला माझा संसार फुलला, त्या गंजपेठच्या घराचा रस्ताच मी विसरून गेलो.

वर्षामागून वर्षं लोटत गेली. माझ्या दोन्ही मुलांची मी लग्नं केली; पण भावाला बोलावलं नाही. तोही आला नाही. भावाची दोन नंबरची मुलगी माझी खूप लाडकी होती. तिचं "अबोली'' हे नाव मीच ठेवलं होतं. पण तिच्या लग्नाला भावानं बोलावलं नाही. मीही गेलो नाही.

नातेवाइकांच्या लग्न समारंभामध्ये भाऊ-भावजय दिसायची; पण आम्ही दोघंही एकमेकांचे तोंड पाहत नव्हतो; मग बोलणं तर दूरच. भावाची मोठी मुलगी राणी फलटणची नगरसेविका बनली. एकमेकांबद्दलच्या इत्थंभूत बातम्या हस्ते-परहस्ते दोघांनाही कळत होत्या. मनातून आनंद वाटत होता. पण ओठ गच्च शिवलेले होते.

कालचक्र फिरतच होतं. बोल बोल म्हणता एक दशक सरलं. तब्बल दहा वर्षं आम्ही एकमेकांकडे ढुंकून पाहिलं नाही. अध्येमध्ये स्वप्नात भाऊ यायचा. विरोधाची धारही कमी होऊ लागली होती. मनातून खूप वाटायचं- झालं गेलं विसरून भावाला भेटायला जाऊ या. बायकोही मनधरणी करायची- "तुम्ही एकाच रक्ताचे सख्खे भाऊ; मग किती दिवस एकमेकांपासून दूर राहणार. आपल्यातरी जवळचं कोण आहे? तुम्हीच जर असा आडमुठेपणा धरून ठेवला तर आपल्या मुलांमध्ये तरी आपल्यामागे एकमेकांबद्दलची आपुलकी, प्रेम राहील का?' पटत होतं, पण वळत नव्हतं.

माझ्या थोरल्या बहिणीला - ताईला वाटायचं, मी मरण्याअगोदर तरी हे दोन भाऊ एकत्र आलेले मला पाहायला मिळतील का? तिची ही तळमळ काही नातेवाइकांमार्फत माझ्यापर्यंत पोचत होती. काळजात चर्रर होत होतं, पण मन तयार होत नव्हतं. स्वतःचा अहंकार फणा काढून सदैव डंख मारत होता.

तो धाकटा आहे, त्यानं एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे? त्याच्या मुलींचे एवढे लाड केले, पण त्या एखाद्या समारंभात भेटल्या तर माझ्याकडे धावत का येत नाहीत? आम्हा भावा-भावांचं भांडण झालं असेल, त्यांनी का अबोला धरावा? माझ्याशी बोलायला त्यांना कोण अडवणार आहे? प्रश् आणि प्रश्नच. मनात पडलेला प्रश्नांचा गुंता सुटत नव्हता, तर तो अहंकाराला फुंकर घालत होता.

भावाच्या धाकट्या मुलीचं- दीपाचं लग्न ठरलं. माझ्या तिन्ही मुलांनी एकमतानं ठरवलं, काकाच्या शेवटच्या मुलीचं लग्न; या लग्नाला जायचं. थोरल्या मुलानं माहेरी गेलेल्या बायकोला बोलावून घेतलं. मुलांना आईची साथ मिळाली. सगळे जण माझी विनवणी करू लागले. काही झालं तरी दीपाच्या लग्नाला जायचंय.

पण लग्नात आपला कोणी अपमान केला तर...? त्याची चूक होती म्हणून तो झक्कत माझ्या पाया पडायला आला, असं भाऊ सगळ्यांना सांगू लागला तर...?

"मन चिंती ते वैरी चिंती' असं म्हटलं जातं. मनात अनेक शंका-कुशंकाचे काळे ढग झाकोळून आले. माझा अहंपणा माझ्या मनात अनेक खड्डे-खळगे निर्माण करीत होता. पण बायकोसह मुलांनी चंगच बांधला होता. कोणत्याही परिस्थितीत माझ्यासह लग्नाला जायचंच. मी मोठा भाऊ या नात्यानं मन मोठं करून पुढाकार घ्यायचा. बायको-मुलांपुढे माझं काही चाललं नाही. सकाळी १२.३० चा मुहूर्त होता. भवानी पेठेतील "लक्ष्मी बाजार मंगल कार्यालया' लग्न होतं.

आम्ही सर्व जण सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास कार्यालयात पोचलो. खाली दरवाज्यातच भाऊ उभा होता. आम्हाला पाहताच त्याच्या डोळ्यांत चटकन पाणी आलं. माझ्याही डोळ्यांत अश्रू जमा होऊ लागले होते. वर हॉलमध्ये आम्ही जाताच नातेवाइकांमध्ये एकच गलका झाला. जो तो माझं नाव घेऊन "आला... आला...' असं म्हणू लागला.

राणीनं मला पाहताच माझ्या गळ्याला कडकडून मिठी मारली. "पप्पा, तुम्ही आम्हाला का विसरून गेलात...' तिच्या या वाक्याने आत्तापर्यंत आवरून धरलेला अश्रूंचा बांध फुटला गेला. दोघेही हुंदके देत रडू लागलो. जवळच भाऊसुद्धा रडत उभा होता. ताई त्याला घेऊन माझ्याजवळ आली. मला मिठी मारत तो म्हणाला, "मी असा काय गुन्हा केला, की तू मला वाळीत टाकलंस.''

सगळे नातेवाईक आमच्याजवळ गोळा झाले. माझ्या मावसभावाचे जावई म्हणाले, "मामा, आज भरतभेट पाहिली. डोळ्यांचं पारणं फिटलं. तुम्ही आल्यामुळे लग्नाला खऱ्या अर्थाने शोभा आली.''

अनेक जण मला म्हणाले, "तू मोठा आहेस. तू मन मोठं करून सगळ्या कुटुंबाला घेऊन लग्नाला आलास. खूप चांगलं केलंस. तू जास्त शिकलासवरलेला आहेस. आपल्या दुबळ्या भावाच्या मागे उभा राहा. त्याला वाऱ्यावर सोडू नकोस.''

सगळे संभ्रम दूर झाले. जेथे भाऊ नीट बोलेल की नाही याची धास्ती वाटत होती, तिथं उलटंच घडलं. लग्नाची सगळी सूत्रं भावानं माझ्या मुलांच्या हवाली केली.

लग्नाचा सोहळा पाहताना मनात आलं, की आपला अहंकार आपल्याला सुखाच्या कित्येक क्षणांपासून वंचित करतो। ते सुखद क्षण आपण आपल्या हातातून निसटून जाऊ देतो. पैसा येतो आणि जातोही; पण जीवनात येणारे सुखाचे क्षण पुन्हा नाही जीवनात येत. आपल्या अहंकारामुळे आपल्या लाडक्या पुतणीचं- नव्हे मुलीचं लग्न आपल्याला नाही पाहता आलं आणि आपल्या पुतणीला मिळालेला नगरसेविकेचा मान... तो तरी कोठे पाहता आला. हे सुखाचे क्षण केवळ आपल्या अहंपणामुळेच आपल्या हातून गेले ना! मग आपल्या शिक्षणाचा, व्यासंगी वाचनाचा काय उपयोग? आणि आपल्या पोकळ पांडित्याचा तरी काय उपयोग?

सौजन्य:-सकाळ

No comments:

Post a Comment