Wednesday, July 1, 2009

माझं किचन: मंजूषा दातार-गोडसे


असंभव' आणि "राजा की आयेगी बारात' अशा मालिकांमधून सध्या घराघरात पोचलेल्या मंजूषा दातार-गोडसे स्वयंपाकही उत्तम करतात. किचनमध्ये स्वच्छता हवी आणि सगळ्या गोष्टींची आधी तयारी करून मग पटापट स्वयंपाक उरकायचा, कोणताही स्वयंपाक दीड तासात उरकतो, असं त्या सांगतात. त्यांचं हे स्वयंपाकाविषयीचं आणि किचनविषयीचं मनोगत.

लग्नाआधी मी घरात सर्वांत लहान असल्यानं स्वयंपाक करायची कधी वेळच आली नाही. आई कधी सांगायची नाही आणि ती नसेल, तेव्हा मोठी बहीण असायची. त्यांना कांदा चिरून दे, इतर काही कामं कर अशी लुडबूड करायचे; पण मोठी जबाबदारी कधी पडली नाही. लग्नानंतर मात्र मला बरंच टेन्शन आलं होतं. एक तर सासरी एकत्र कुटुंब होतं. त्यात मी माहेरची दातार आणि नंतर गोडसे. त्यामुळे कोकणस्थ आणि देशस्थ असा फरकही होता. पण अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं.

एक तर माझ्याकडे तीन रेसिपी बुक्‍स होती. माझी आई, ताई आणि तिसऱ्या स्वतः सासूबाई. त्यामुळे काही अडलं, की पटकन्‌ त्यांना विचारायचं आणि करून टाकायचं, असं सरळसोपं गणित होतं. शिवाय घरातले सगळेच खूप चांगल्या स्वभावाचे. कुणाचं पदार्थाला नावं ठेवणं नाही, की नखरे नाहीत. शिवाय दाद देण्याची पद्धत. मला आठवतं, की पहिल्यांदा केलेल्या पोळ्यांचंदेखील सगळ्यांनी खूप कौतुक केलं होतं. "किती छान झाल्यात, मऊ झाल्यात,' असं सगळ्यांनी म्हटलं होतं. खरं तर पोळ्यांसारख्या पोळ्या; पण त्यांच्याबद्दलही दाद मिळाली. अशा वातावरणामुळे मग आणखी हुरूप येतो.

आमच्या घरात गौरी-गणपती, नवरात्र, दिवाळी सगळं एकत्र असतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये मी शूटिंग किंवा नाटकाचे प्रयोग यांच्यामधून आवर्जून वेळ मोकळा ठेवते. या दिवसांत नैवेद्य, मोदक असा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक असतो. तोही मी करते. बऱ्याचदा मुंबईला सलग दहा-बारा दिवस शूटिंग असतं. त्यामुळे तिथंही छोटं किचन आहे. मात्र, तिथं स्वयंपाकाला वेळ खूप कमी मिळत असल्यानं तिथं सगळा इन्स्टंट मामला असतो. खाण्याचा, करून घालण्याचा खरा आनंद अर्थातच पुण्यातच मिळतो. माझा पती अभय खूप चांगला स्वयंपाक करतो. मी नसताना मुलाला- रुद्रला डबाही बऱ्याचदा तोच करून देतो. त्यामुळे मी पुण्यात असते, तेव्हा त्यांना चांगलंचुंगलं करून खायला घालावं, त्यांना काही करायला लागू नये, हे मी आवर्जून बघते. रुद्र शाळेला सव्वासहाला जातो, अभयही ऑफिसला लवकर जातो. त्यामुळे पुण्यात साडेपाचलाच स्वयंपाक सुरू होतो. रुद्र दहा वर्षांचा आहे. तो आणि त्याचे बाबा यांचं खूप छान ट्यूनिंग आहे आणि दोघंही कधी अन्नाला नावं ठेवत नाहीत. कधी मीठ कमी-जास्त पडलं, तर बोलतसुद्धा नाहीत. सासूबाईही खूप छान स्वयंपाक करतात; पण त्याही प्रत्येक पदार्थाला दाद देतात.

स्वयंपाक करत असताना किचन स्वच्छ असलं पाहिजे, असा माझा कटाक्ष असतो. पुण्यात आले, की मी पहिल्यांदा अर्धा तास सगळं जागच्या जागी लावून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. किचन स्वच्छ असलं, की तुमचं मनही प्रसन्न होतं आणि त्यामुळे कामंही खूप लवकर आणि उत्साहानं उरकली जातात, असं मला वाटतं. माझा कुठलाही स्वयंपाक- अगदी पुरणाचा स्वयंपाकही दीड तासात उरकतो. "हिचं कधी होतं कळतही नाही,' असं सासूबाई म्हणतात. मला खूप वेळ किचनमध्ये घालवायला आवडत नाही. मात्र, तिथं जेवढा वेळ असते, तो योग्य रीतीनं, मनापासून वापरते. बाकी गोष्टींत जसं कॉन्संट्रेशन लागतं, तसं किचनमध्येही गरजेचं असतं. स्वयंपाक करताना कणीक भिजवून ठेवायची, भाज्या चिरायच्या, अशी सगळी तयारी आधी करून घेते. एक तर कणीक मुरल्यामुळे पोळ्या चांगल्या होतात आणि सगळी सिद्धता आधी झाल्यामुळे मग प्रत्यक्ष पदार्थ पटापट उरकतात. तुम्ही आता कुकर लावू, मग पोळ्या करू असं काम रेंगाळत ठेवलंत, की मग गोंधळ उडतो. बहुतेक वेळा सकाळी सातपर्यंत माझा स्वयंपाक उरकलेला असतो. बाई मदतीला असतील, तर काम आणखी पटापट होतं.

वेळ मिळेल, तेव्हा टीव्हीवरचे रेसिपी शोज मी बघते आणि जमेल तेव्हा करूनही बघते. अर्थात ठरवून वेगळेपणानं काही करत नाही, कारण आपल्याकडे मुळातच इतके वैविध्यपूर्ण पदार्थ आहेत, की ते करून बघणं हेच खूप मोलाचं आहे असं मला वाटतं. आतापर्यंत सुदैवानं माझा कुठलाच पदार्थ बिघडलेला नाही. माझ्या पदार्थांमधला पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या हे पदार्थ सगळ्यांना आवडतात. माझ्या दृष्टीनं आयडियल किचन म्हणाल, तर माझ्या ताईचं आहे. "मावशीचं घर म्हणजे हॉटेलच आहे ना, पाहिजे तो पदार्थ मिळतो,' असं माझा मुलगा म्हणतो. ती पाहिजे ते पदार्थ करून देते आणि स्वच्छता, टापटीपही तितकीच असते. माहेरकडून मिळालेली शिस्त, नीटनेटकेपणा आणि सासरची आपुलकी, अगत्य अशा चांगल्या गोष्टींचा सुवर्णमध्य साधल्यानं माझं आयुष्य खूप छान, सुंदर बनलं आहे आणि स्वयंपाकामध्येही त्याचं प्रतिबिंब उमटतं आहे.
मंजूषा दातार-गोडसे

सौजन्य : ई-सकाळ

No comments:

Post a Comment