२)
सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला ?
आता आभाळ भेटले रे
अंग फुलांनी पेटले रे
पहा कसे ऐकू येती श्वास माझे मला
फांदी झोक्याने हालते रे
वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला
जुने आधार सुटले रे
तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या वेड्या तुझ्या फुला
3)
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
डोळे भरून तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!
काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!
पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
४)
साधं सोपं आयुष्य
साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!
मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...
आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!
पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं
असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं
साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं ॥!
5)
जरि तुझिया सामर्थ्याने
ढळतील दिशा जरी दाही
मी फूल तॄणातील इवले
उमलणार तरिही नाही
.
शक्तीने तुझिया दिपुनी
तुज करितिल सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठांतील गाणे हसरे
.
जिंकील मला दवबिंदू
जिंकील तॄणाचे पाते
अन स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नाते
.
कुरवाळीत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करितिल सजल इषारा
.
रे तुझिया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे
.
येशील का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा
उधळीत स्वरांतून भवती
हळु सोनेरी अभिसारा
.
शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होऊनि ये तू
कधि भिजलेल्या मातीचा
मदू सजल सुगंधित हेतू
.
तू तुलाच विसरून यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे
.
पण तुझिया सामर्थ्याने
ढळतील दिशा जरी दाही
मी फूल तॄणातील इवले
उमलणार तरिही नाही..
No comments:
Post a Comment